पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर नाव न घेता जोरदार टीका केली. भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, कारण ते काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडताना सामंत बोलत होते. उदय सामंत म्हणाले की, शिवसेना ही पुण्याच्या विकासावर बोलणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कुणावरही टीका करत नाही. शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई पुण्यात सुरू असून आमच्यासमोर मोठी आर्थिक ताकद आहे. तरीही पुणेकरांचा आशीर्वाद शिवसेनेलाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या मित्रपक्षांना वाटत होते की शिवसेना उमेदवार उभे करू शकणार नाही. मात्र काही तासांतच 120 उमेदवार उभे करून आम्ही ताकद दाखवली आहे. वेळ मिळाला असता तर 165 उमेदवारही दिले असते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आता पुण्याचा महापौर हा शिवसेनेच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही, असेही सामंत म्हणाले. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात 120 जागांवर निवडणूक लढवत आहे. उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता 16 तारखेला निकाल लागल्यानंतर महापौर निवडीत शिवसेनेला दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर होते. त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे घराघरात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले. संघर्ष हा शिवसैनिकांच्या पाचवीला पूजलेला आहे. उमेदवारांनी लोकांच्या घरी वारंवार जावे, जनतेशी थेट संपर्क साधावा, असे सांगत सामंत यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. 2004 मध्ये निवडणूक लढताना पराभव झाला, पण आज मी पाच वेळा आमदार आहे. जनता नेहमी तरुणांच्या पाठीशी उभी राहते, असे ते म्हणाले. समोरून टीका झाली तर त्याला विकासातून उत्तर द्या. ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे. पुढील 14 दिवस अहोरात्र काम करून पुण्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवा, असे आवाहन करत सामंत यांनी शिवसैनिकांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.