Manoj Jarange Patil : राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार असतानाच, मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत थेट उडी घेतली आहे. “जे समाजाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात गेले, त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा,” असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले आहे. जरांगे पाटलांच्या भाषणातील मुख्य मुद्दे : मराठा समाजाने आता निवडणुकीच्या राजकारणात कट्टर होणे गरजेचे आहे. ज्यांनी आरक्षण नाकारले, त्यांचे उमेदवार पाडण्यासाठी ‘खुन्नस’ ठेवा, असे जरांगे पाटील म्हणाले. “या सरकारने मुस्लिम आणि दलित समाजाचीही दिशाभूल केली आहे. लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीतही यांचा ‘फेसा’ काढायचा आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी पक्षांकडे खूप पैसा असून ते नोटांची बंडलं वाटून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “आधी यांच्याकडे काय होतं? आता मात्र शर्टाच्या खिशातून नोटांची बंडलं दिसतायत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सध्याच्या ‘खिचडी’ युतीवरही प्रहार केला. “या निवडणुकीत कोणाची कोणासोबत युती आहे, हेच कळायला मार्ग नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. मग यांचा शत्रू कोण? तर सामान्य गोरगरीब जनताच ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदा, नगरपालिका अशा स्थानिक लेव्हलच्या निवडणुकीत मी पडतच नाही, आपल्याला टप्पू (मोठा) मासा लागतो, त्याला जर माज असेल तर तो माज मी उतरवलाच म्हणून समजा असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीचे वेळापत्रक : मतदान: १५ जानेवारी २०२६ – मतमोजणी: १६ जानेवारी २०२६