Sanjay Raut : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार याबाबतचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. मुंबईत शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंपैकी कुणाचा महापौर व्हावा, यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये, अशी भावना अनेकांमध्ये असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, सध्या निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच असून त्यांच्या मनात आजही मराठी अस्मितेची ज्योत तेवती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राऊत पुढे म्हणाले, “बहुमत हे कायमस्वरूपी नसतं, ते चंचल असतं. आज इकडे असलेलं बहुमत उद्या तिकडे सरकू शकतं. नगरसेवकांना किती दिवस कोंडून ठेवणार?” असा सवाल करत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. कोंडून ठेवलेल्या नगरसेवकांपर्यंत संपर्क साधण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात, असंही त्यांनी नमूद केलं. देवाची इच्छा असेल तर मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितलं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली असून अनेक राजकीय नेत्यांशी संवाद सुरू आहे. सध्या वरवर तटस्थ भूमिका असली तरी पडद्यामागे घडामोडी वेगाने सुरू असल्याचं त्यांनी सूचित केलं. जगातील सर्वात मोठ्या पक्षाला केवळ चार जागांचा फरक आहे. एवढ्या अल्प फरकात बहुमत कितीही मोठं वाटलं, तरी ते अस्थिर असू शकतं,” असंही राऊत म्हणाले. ‘ताज लँड्स एंड’वरून टोला.! दरम्यान, काही नगरसेवकांना ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मिश्किल शैलीत टोला लगावला. “आम्हीही आज ताज हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. नगरसेवकांना कोंडून ठेवण्याऐवजी त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. मुख्यमंत्री म्हणून तिथे पोलिसांचा बंदोबस्त हटवावा,” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.