मुंबई : राज्यातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाला होता. दरम्यान, सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील, असं आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान अनेक महायुती नेत्यांनी दिलं होतं. मात्र सरकार स्थापन होऊन जवळपास वर्ष उलटलं असतानाही 2100 रुपयांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार? हा प्रश्न आता राज्यातील लाखो महिलांना पडला आहे. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाला उदय सामंत यांचं उत्तर काल मुंबईत पार पडलेल्या मनसे-शिवसेना (ठाकरे गट) संयुक्त सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट सरकारला सवाल केला होता की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. योग्य वेळी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नका,” असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. पुढचे 72 तास अत्यंत महत्त्वाचे उदय सामंत हे नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केलं. “पुढचे 72 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुंबईकर शिवसेना-भाजपला आशीर्वाद देतील. ठाकरे गट 287 ठिकाणी लढला, त्यांचे 8 नगराध्यक्ष निवडून आले, तर आमचे 72 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजप आमच्या समोर असली तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.