राजगुरूनगर : वाडा–साकुर्डी व परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. चास कमान धरणातील हुतात्मा राजगुरू जलाशयात नवीन लाँच दाखल झाल्याने नागरिकांना सुरक्षित जलप्रवासाचा मार्ग उपलब्ध झाला असून, या लाँचचे लोकार्पण माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चास कमान धरणामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा परिसर दोन भागांत विभागला गेला होता. धरण होण्यापूर्वी परस्परावलंबी असलेली वाडा, साकुर्डी, कहू, कोयाळी, माजगाव, देवोशी, औदर, चिखलगाव आदी गावे व वाड्यावस्त्या पाणीसाठ्यामुळे वेगळी पडली होती. परिणामी दरवर्षी जून ते एप्रिल या कालावधीत नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. लाँचची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून होडीने प्रवास करावा लागत होता. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरदार, दूधवाले तसेच रुग्णांसाठी हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत होता. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत होती. होडी प्रवासाच्या भीतीमुळे काही विद्यार्थिनींनी वाडा येथे शिक्षणासाठी जाणे टाळल्याचीही उदाहरणे होती. या मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे पुणे जिल्हा परिषदेकडून दीर्घकाळ दुर्लक्ष झाले होते. मात्र वाडा–साकुर्डी व परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न प्रशासनासमोर लावून धरला. गेली दोन वर्षे लाँच येणार असल्याची आश्वासने मिळत असतानाही नागरिकांना मात्र जीवघेण्या होडी प्रवासावर अवलंबून राहावे लागत होते. अखेर नवीन लाँच जलाशयात दाखल झाल्याने नागरिकांचा अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे. लाँच सुरू झाल्यामुळे सुरक्षित, जलद व स्वस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला असून, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सुलभ होणार आहे. तसेच रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे शक्य होणार असून नागरिकांचा वेळ व प्रवास खर्च दोन्हीही वाचणार आहेत. यासोबतच परिसरातील स्थानिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. रविवारी (दि. २१) रात्री लाँच जलाशयात दाखल होताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लोकार्पण व पूजनप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, युवासेना तालुका प्रमुख मृण्मय काळे, साकुर्डीच्या सरपंच रोहिणीताई गवारी, माजी सरपंच कुंदाताई कडू, शिवाजी मोरे, जाकीर तांबोळी, संदीप घनवट, चासचे सरपंच विनायक मुळूक, उल्हास देवदरे, ओंकार गवारी, अक्षय केदारी, ज्ञानेश्वर सुरकुले, गुलाब कडू, सुनील पावडे, लाँच चालक सुधीर ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चास कमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयातील होडी प्रवास अत्यंत धोकादायक होता. नवीन लाँचसाठी जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व आमदार बाबाजी काळे यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. लाँच सुरू झाल्याने नागरिकांना सुरक्षित, जलद व स्वस्त प्रवासाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. — रोहिणी गवारी, सरपंच, साकुर्डी ग्रामपंचायत