कोलंबो – दित्वाह चक्रिवादळाने केलेल्या थैमानानंतर झालेल्या विनासातून श्रीलंका अजूनही पुर्णपणे सावरलेली नसताना आता पुन्हा अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेतल्या प्रशासनाने रविवारी हा इशारा दिला आणि आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. दित्वाह चक्रिवादळामुळे झालेले नुकसान अबूतपूर्व असून गेल्या दशकभरातील ही सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती असल्याचे श्रीलंकेच्या प्रशासनाने म्हटले आहे. दित्वाह चक्रिवादळामुळे आतापर्यंत ६१८ जण मरण पावले असून अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. देशाच्या दुर्गम भागातील नुकसान झालेल्या भागांपर्यंत अजूनही मदत आणि बचाव पथकांना पोचता आलेले नाही. जेथे अजून पोचता आलेले नाही, तेथील संपर्कासाठी हेलिकॉप्टर आणि हलक्या विमानांना तयार ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. म्यानमारकडून मागवलेले मालवाहू विमान आल्याचे श्रीलंकेच्या हवाई दलाने सांगितले. वादळामुळे घरे पडल्याच्या हजारो घटना घडल्या आहेत. किमान ५ हजार घरे पुर्णपणे जमिदोस्त झाली आहेत. तर ७५ हजार घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. किमान १ लाख लोकांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या छावण्यांमधून सव्वा २ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. एका पाठोपाठ एक आलेली वादळे आणि थोड्या थोड्या काळानंतर येत असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीलंकेच्या अग्नेयेकडील आणि मध्यवर्ती प्रांतातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांना जोडणारे रस्ते वाहून गेले असल्याने या भागांशी असलेला संपर्क तुटला आहे. या पावसामुळेच पुन्हा दरडी कोसळण्याचा इशारा दिला गेला आहे. आशिया खंडात श्रीलंकेव्यतिरिक्त इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाममध्येही या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित इतर दुर्घटनांमुळे या देशांमध्ये मिळून आतापर्यंत १,८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या श्रीलंकेत देशाच्या लोकसंख्येच्या १० टक्के म्हणजे २० लाख लोकांना दित्वाह चक्रिवादळाचा फटका बसला आहे. मात्र अजूनही वादळाशी संबंधित पर्जन्यवृष्टीचा धोका कमी झाला नसून डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राने म्हटले आहे. भारताकडून मदतीसाठी नौदलाचे जहाज रवाना श्रीलंकेतल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत, भारतीय नौदलाने श्रीलंकेत मदत पोचवण्यासाठी आणखी चार युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामद्ये आयएनएस घरियाल आणि तीन लँडिंग क्राफ्ट युटिलिटी जहाजे – एलसीयू ५४, एलसीयू ५१ आणि एलसीयू ५७ – यांचा समावेश आहे. या युद्धनौका बाधित श्रीलंकेच्या किनारी भागात सुमारे १ हजार टन आवश्यक मदत साहित्य पोहोचणार आहेत. यापूर्वी, आयएनएस विक्रांत, आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सुकन्या यांनी हेलिकॉप्टरने शोध आणि बचाव कार्यासह तात्काळ मदत पुरवली होती.