लातूर – लातूरच्या भूमीने या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिले. त्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याही नावाचा समावेश आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्याप्रीत्यर्थ गौरवोद्गार काढले. तसेच रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याचे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रवींद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्याने लातूरमध्ये गदारोळ झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील सभेत विलासराव देशमुखांचा गौरव करत चव्हाण यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लातूर ही अशी भूमी आहे, जिने महाराष्ट्राला अनेक महत्त्वाचे नेतृत्व दिले. यात चाकूरकर साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा समावेश होतो. राजकारणात अशा नेत्यांचा पाया मोलाचा असतो आणि त्यांच्या योगदानाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्व पक्षांच्या प्रचाराचा, सभांचा धडाका सुरू असून लातूरमधील एका सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ झाला. विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असे वक्तव्य चव्हाण यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली. काँग्रेस पक्षासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी, तसेच विलासराव देशमुख यांचे पुत्र यांनीही चव्हाण यांच्या विधानाचा निषेध केला.