Pune Municipal Corporation Election : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच पुण्यात काही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. एवढेच नाही तर यातील एका बॅनरवर तर थेट महापौर हा उल्लेख केला आहे. पुण्यात भाजपचे वरिष्ठ नेते गणेश बिडकर यांच्या विजयाच्या बॅनरवर महापौर असा उल्लेख करण्यात आला आहे. खरंतर पुण्यातील काही प्रभागांमधील लढती विशेष चर्चेत राहिल्या. यामध्ये सगळ्यात हायहोल्टेज लढत राहिली ती प्रभाग क्रमांक २४ मध्ये. याच प्रभागातून भाजपचे गणेश बीडकर यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच उत्साही कार्यकर्त्यांनी गणेश बीडकर यांचा विजयाचा बॅनर लावला आहे. गणेश बीडकर हे २०२७ मध्ये पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडूण गेले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. तसेच बीडकर भाजपचे सभागृह नेते देखील राहिलेले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले सचिन दोडके यांचे देखील विजयाचे बॅनर झ्ळकले आहेत. या बॅनरवर तर थेट भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप उमेदवार लहू बालवडकर यांचे देखील विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘जनतेचा विश्वास विजयी झाला’ असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. येथील फाईट देखील टफ मानली जात आहे. लहू बालवडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर रिंगणात आहेत. एकंदरीत निकाल जाहीर होण्याअगोदर पुण्यात विजयाचे बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. हेही वाचा : मुंबई महापालिकेत भाजपाला ‘एवढ्या’ जागा मिळणार? ; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा, पोस्ट शेअर करत सांगितला थेट आकडा