Agricultural – आखाती युद्धाचा फटका आता महाराष्ट्रातील शेतक-यांना बसू लागला आहे. सध्या फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची हवाईमार्गे होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास राज्याच्या निर्यातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षामुळे राज्यातील द्राक्ष, केळी व आंबा निर्यातीला मोठा फटका बसत आहे. हजारो कंटेनर परदेशी बाजारपेठेत पाठवण्याच्या प्रतीक्षेत अडकले आहेत. याशिवाय आखाती देशांमध्ये निर्यातीच्या तयारीत असलेले कांदा, केळीचे सुमारे एक हजार कंटेनर शनिवारपासून जेएनपीए बंदरात अडकले आहेत. सांगली जिल्ह्यातून निर्यात होणा-या द्राक्षांसोबतच हळदीलाही फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार १४,५०० पासून २४ हजारपर्यंतचा दर मिळत होता. पण आता हा दर प्रति क्विंटल हजार ते बाराशे रुपयांनी उतरला आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. US-Israel Iran War: तसेच जळगाव जिल्ह्यातील आशिया खंडात अग्रेसर असलेल्या चटई उद्योगही आता अडचणीत सापडला आहे. आखाती देशात निर्यात होत असलेली जळगावची चटई आता युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात होऊ शकत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका चटई उद्योगाला बसला आहे. आखाती देशात मुंबईतून रोजचा चारशे ते पाचशे टन इतका शेतमाल निर्यात होतो. त्यामध्ये पेरू, चिक्कू, द्राक्षांसह आंब्यांची तुरळक निर्यातही सुरू झाली होती. मात्र ती आता थांबली आहे. रमजानच्या काळात नाशिकच्या द्राक्षांना आखाती देशांत मोठी मागणी असते. मात्र युद्धामुळे निर्यात थांबल्याने शेतक-यांना १,५०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बासमती तांदळावरही घाव भारतातून होणा-या एकूण बासमती तांदूळ निर्यातीपैकी सुमारे २५ टक्के इराणला आणि २० टक्के इराकला जातो. दोन्ही देशांना मिळून दरवर्षी २० लाख टनांहून अधिक बासमती निर्यात होतो, ज्याची किंमत १८,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बासमतीच्या दरात एका दिवसात ४-५ रुपये प्रति किलो म्हणजेच ४००-५०० रुपये प्रति क्विंटल घसरण झाली आहे.