Mumbai Municipal Corporation Mayor : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीला मोठे यश मिळाले. ठाकरे बंधूंची युती महायुतीपुढे आव्हान निर्माण करू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तसे झाले नाही. पण तरीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल ६५ नगरसेवक महापालिकेवर निवडणूक आलेले आहेत. भाजपला ८९ जागांवर विजय मिळाला असला तरी स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे अडीच वर्ष महापौर पद शिवसेनेला मिळावे यासाठी अडून बसले आहेत. यावरून राजकारण रंगले असतानाच महापौर पदाची आरक्षण सोडत २२ जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका सूचक विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल’, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. या विधानाचा संदर्भ घेतल्यास २२ जानेवारीच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष असणार आहे. राज्यातील २९ महापालिकांसह मुंबई महापालिकेतील महापौरपद कोणत्या जातीसाठी आरक्षित होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे यंदा महापौर पदाची आरक्षण सोडत ही चक्राकार पद्धतीने काढली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल. जुन्या चक्राकार पद्धतीचा विचार केला असता मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीच्या वाट्याला येण्याची शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की, अनुसुचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आलेले आहेत. तसे झाल्यास भाजप आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. २२ तारखेला चित्र स्पष्ट होणार तसेच जुन्या चक्राकार पद्धतीचा अलवंब न होता नवीन चक्राकार पद्धतीने जरी महापौर पदाची आरक्षण सोडत काढली आणि त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरीही भाजप आणि शिवसेनेची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा एकही नगरसेवक नाही. मुंबईसाठी महापौर पदावरून जे काही राजकारण रंगले आहे, त्यामुळे २२ जानेवारीला महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. हेही वाचा : Rani Mukerji: ‘ती मला उलट थप्पडही मारू शकते…’ राणी मुखर्जीला सगळ्यात जास्त भीती कुणाची?