मुंबई : राज्यात नगरपालिका निवडणुकांनंतर राज्यात पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर, ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची मुंबईत शिवसेना भवन येथे बैठक घेतली आहे. यावेळी, त्यांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेची तयारी आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केले आहे. ठाकरे यांनी यावेळी सर्वच जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत का? सोबत महाविकास आघाडी म्हणून तो उमेदवार सर्वाना पसंत आहेत का? गण आणि गटाची ताकद किती? त्यात मनसेची ताकद किती? या सर्व बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानेही उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. त्यामध्ये, प्रभागात सध्याचा नगरसेवक कोणता? त्या विभागात आपली ताकद किती आहे, तसेच महाविकास आघाडी म्हणून कुठला उमेदवार सक्षम यासंदर्भातील आढावा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत.