पणजी – गोव्यात दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी एका पुरूषाला अटक केली आहे. ही घटना उत्तर गोव्यातील अरंबोल आणि मोरजीम गावात घडली. १४ आणि १५ जानेवारी रोजी दोन रशियन महिलांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अलेक्सी लिओनोव्ह या रशियन पुरूषाला अटक करण्यात आली आहे. मँड्रेम पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने १४ जानेवारी रोजी मोरजीममधील त्याची मैत्रिण एलेना वनेवा (३७) हिची तिच्या खोलीत चाकूने वार करून हत्या केली. वनेवाच्या घरमालकाच्या तक्रारीनुसार, ही घटना रात्री ११ वाजल्यानंतर घडली. मोरजीम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, १५ जानेवारी रोजी संध्याकाळी आरोपी आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अरंबोल गावात त्याच्या मैत्रिणी एलेना कस्तानोव्हा (३७) हिला भेटायला गेला होता. त्याने तिला दोरीसारख्या वस्तूने बांधले आणि नंतर तिचा गळा कापला. शुक्रवारी दोघांचेही मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. मँड्रेम पोलिसांनी लिओनोव्हला अटक केली आहे आणि तपास सुरू आहे.