इंदापूर : पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी उकळणार्या दोन तोतया पत्रकारांचा खरा चेहरा इंदापूर पोलिसांनी उघड केला आहे. धमक्या, बदनामीची भीती आणि आर्थिक पिळवणूक करून एका हॉटेल व्यावसायिकास अक्षरशः आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेणार्या या दोघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण साळवे (रा. मळद, ता. बारामती) व संदीप हनुमंत रासकर (रा. पुणे-42) अशी या दोघांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. गागरगाव (ता. इंदापूर) येथील ‘96 कट्टा’ या हॉटेलचे व्यावसायिक नितीन गोरख तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वतःला पुण्यातील नामांकित वृत्तपत्रांचे पत्रकार असल्याचे सांगून सातत्याने फोन करून धमक्या देत होते. तुम्ही रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवता. पुणे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक आमच्याशी ‘सेटिंग’मध्ये आहेत. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दरमहा पैसे द्या, अन्यथा बदनामीकारक बातम्या छापून हॉटेल बंद पाडू, अशी दहशत आरोपींकडून निर्माण करण्यात येत होती. या दबावाखाली तक्रारदाराने फोन-पे तसेच रोख स्वरूपात अनेक वेळा पैसे दिले; मात्र आरोपींची मागणी वाढतच गेली व त्यांनी थेट दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागण्यास सुरुवात केली. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून तक्रारदार नितीन तळेकर यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, या तोतया पत्रकारांवर यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे तसेच मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्रकारकीच्या नावाखाली सुरू असलेल्या या खंडणीखोरीवर इंदापूर पोलिसांनी वेळीच घाव घातल्याने परिसरातील हॉटेल व्यावसायिक व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खर्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन करणार्या तोतया पत्रकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.