पुणे : पुण्यात भारतीय जनता पक्षाने निवडणूकी आधीच खाते उघडले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ३५ (ब) मधील उमेदवार मंजूषा नागपूरे आणि प्रभाग ३५ (ड) सर्व साधारण या गटातून श्रीकांत शशिकांत जगताप हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नागपूरे यांच्यासह या प्रभागात सहा उमेदवारांचे अर्ज होते. त्यातील दोन अर्ज छाननीत बाद झाले होते. त्यानंतर चार अर्ज शिल्लक होते. त्यातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली त्यामुळे नागपूरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. या प्रभागात मागील दहा वर्षांपासून त्या सातत्याने कार्यरत असून नागपूरे यांचे पती दिपक नागपूरे हे भाजपचे सरचिटणीस आहे. या प्रभागात शहरात सर्वाधिक कमी अर्ज आले होते. तर, उर्वरीत उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात भाजपला यश आले असल्याने नागपूरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुसरीकडे प्रभाग ३५ (ड) सर्व साधारण या गटातून श्रीकांत शशिकांत जगताप यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे ते देखील बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेल महापालिकेत सात उमेदवार विजयी पनवेल महापालिका निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, भाजपचे जवळपास 8 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. येथून भाजपचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत. नितीन पाटील यांची प्रभाग 18 (ब) मधून निवड झाली आहे. येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. परिणामी पनवेल महापालिकेसाठी मतदानापूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.