– मानवेंद्र उपाध्याय सिनेसृष्टीतील जुन्या नायकांच्या मांदियाळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगात काही चेहरे असे उदयास आले ज्यांनी पडद्याबरोबरच कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ही किमया साध्य झालेल्या सुपरस्टारपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते धर्मेेंद्र. भारतीय सिनेमाचे ‘ही-मॅन’ म्हणून सन्मानाने ओळखले जाणार्या धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आणि सिनेसृष्टीतील एक पर्व संपले. तब्बल चार दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटांच्या पडद्यावर झळकलेले धर्मेंद्र यांनी सशक्त नायक कसा असावा याचे मूर्तीमंत दर्शन प्रेक्षकांना घडवले. एकीकडे बलदंड शरीरयष्टी आणि अॅक्शन दृश्यांसाठी आवश्यक असणारा अभिनय यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता; तर दुसरीकडे सहज अभिनयशैली, प्रासंगिक नर्मविनोद निर्मितीची उत्तम जाण आणि गंभीर प्रसंगांमध्ये चेहर्यावरील हावभावातून प्रेक्षकांची मने हेलावून टाकण्याचे सामर्थ्यही त्यांच्या अभिनयात होते. त्यामुळेच धर्मेंद्र यांनी आपल्या कलात्मक प्रवासात प्रेमळ, रोमँटिक नायकापासून खलनायकाशी चार हात करणार्या नायकापर्यंतची सर्व रुपे साकारली. आपल्यातील या अद्भुत क्षमतांमुळेच पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊनही त्यांनी मुंबईच्या झगमगत्या दुनियेत प्रदीर्घ काळ स्वतःचा ठसा उमटवला. सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र मुंबईत एखाद्या भूमिकेसाठी संघर्ष करत होते. त्यावेळी त्यांची भेट मनोज कुमार यांच्याशी झाली. त्या काळात मनोज कुमार यांनाही फारसे काम मिळत नव्हते. मात्र लेखनकौशल्याच्या जोरावर त्यांचे मुंबईतील राहणीमान काही प्रमाणात चालत होते. पण धर्मेंद्र यांच्या बाबतीत परिस्थिती खूप कठीण होती. त्यांच्याकडे आशा आणि स्वप्नांशिवाय दुसरे काहीच नव्हते. त्यांना उपाशीपोटी दिवस काढावे लागत होते आणि राहण्याचीही तजवीज नव्हती. त्यांनी अखेर मुंबई सोडून परत पंजाबला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले सामान बांधले आणि रेल्वेच्या गाडीत बसलेही. पण मनोज कुमार यांना जेव्हा ही बातमी समजली, ते तत्काळ स्टेशनवर पोहोचले आणि आपल्या मित्राला थांबवले. त्यांनी धर्मेंद्र यांना समजावले की अशी हार मानू नको, नशिबावर विश्वास ठेव. काळ बदलेल, प्रयत्न सुरू ठेव. मनोज कुमार यांच्या प्रेमळ शब्दांनी आणि धीर देणार्या समजुतीने धर्मेंद्र यांचा निर्णय बदलला. त्यांनी परत मुंबईत राहण्याचे ठरवले आणि पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचे फळ लवकरच मिळाले. 1960 मध्ये ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ या चित्रपटातून फक्त रुपये 51 मानधन घेऊन त्यांनी पदार्पण केले. पण त्या पहिल्या पावलाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक सदाबहार नायक मिळाला. पुढील चार दशकांहून अधिक काळ ते बॉलीवूडमधील लोकप्रिय नायक म्हणून झळकत राहिले. 1966 मध्ये आलेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटाने त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या नायकांमध्ये देखणेपणा, शौर्य आणि नम्रता या तिन्ही गुणांचा एकत्रित आविष्कार दिसत होता, त्यात धर्मेंद्र यांचे स्थान अग्रेसर होते. चित्रपटांमधील नायकाकडून प्रेक्षकांना असणार्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचे वर्णन करावे लागेल. नव्वदीनंतरच्या काळात सिनेसृष्टीत चॉकलेट हिरोंची सद्दी निर्माण झाली; पण धर्मेंद्र यांनी साकारलेला नायक हा बलाढ्य खल प्रवृत्तींशी लढणारा, संघर्ष करणारा, कोणत्याही बिकट परिस्थितीतून नायिकेचे रक्षण करणारा, प्रसंगी नायिकेशी खट्याळपणा करणारा, टोकाची सहनशीलता असणारा, अदम्य साहस दाखवणारा होता. आपल्या या प्रतिमेशी विसंगत असणारे ‘चुपके चुपके’सारखे नर्मविनोदी धाटणीचे चित्रपटही केले. 1960 ते 1980 हा काळ धर्मेंद्र यांच्यासाठी सर्वोत्तम ठरला. रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेला वीरू चित्रपटाप्रमाणेच अजरामर ठरला. अमिताभ बच्चनसोबतची त्यांची जोडी विलक्षण लोकप्रिय ठरली. याखेरीज ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’, ‘धरम वीर’, ‘राजा जानी’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘आलाप’, ‘प्रतिज्ञा’, ‘काला पत्थर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयक्षमतेचे दर्शन घडवले. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची जोडी हिंदी सिनेमात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्यांच्या संवादातील विनोद, शारीरिक हावभावातील चैतन्य आणि स्वभावातील निष्कपटता यामुळे धर्मेंद्र हे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करून गेले. धर्मेंद्र यांच्या लोकप्रियतेमागे केवळ अभिनयच नव्हे, तर त्यांची माणुसकी आणि साधेपणा या गोष्टीही कारणीभूत होत्या. करोडोंच्या संपत्तीचे मालक असूनही धर्मेंद्र यांनी स्वतःला कधीही ‘सेलेब्रिटी’ म्हणून मिरवले नाही. त्यांचे लोणावळ्यातील 100 एकरांचे फार्महाउस आज त्यांच्या मेहनतीचे प्रतीक मानले जाते. त्यांची एकूण मालमत्ता 450 कोटी रुपयांदरम्यान आहे. हे संपत्तीचे साम्राज्य त्यांनी केवळ चित्रपटातून नव्हे, तर सुज्ञ गुंतवणुकीतून, रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसाय आणि निर्मितीक्षेत्रातील उपक्रमांमधून उभे केले आहे. नायकपदाची आपली कारकीर्द संपल्यानंतर धर्मेंद्र यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. त्यांच्या ‘विजेता फिल्म्स’ या निर्मितीसंस्थेने ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटमालिकेसह अनेक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट तयार केले. अभिनय, निर्मिती आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी संतुलन साधले आणि पुढच्या पिढीसाठी एक आदर्श उभा केला. त्यांचे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही वडिलांचा हा वारसा पुढे नेत समृद्ध केला. 2022 मध्ये धर्मेंद्र यांनी ‘गरम धरम ढाबा’ या नावाने आपल्या गावाशी आणि आपल्या चाहत्यांशी भावनिक नाळ जोडणारा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ‘ही-मॅन रेस्टॉरंट’ हे नाव घेत त्यांनी आपली ओळख आणखी मजबूत केली. यामधून धर्मेंद्र यांच्यात दडलेल्या उद्यमशीलतेचे दर्शनही लोकांना घडले. हा समृद्ध आणि विलक्षण प्रवास पाहता धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका संक्रमणकाळाचे प्रतिनिधी ठरतात. 1960च्या दशकात हिंदी सिनेमा जेव्हा सामाजिक, काव्यात्मक आणि प्रेमप्रधान विषयांपासून कृतीप्रधान मनोरंजनाकडे वळत होता, तेव्हा धर्मेंद्र हे त्या परिवर्तनाचा चेहरा बनले. त्यांच्या संवादांमध्ये त्या काळातील सामान्य माणसाचे मनोगत आणि आत्मविश्वास प्रतिबिंबित होत असे. धर्मेंद्र यांचे व्यक्तिमत्त्व एकीकडे पुरुषी सामर्थ्याचे प्रतीक असले, तरी दुसरीकडे त्यांनी भावनिक नायकाचेही रूप सहजपणे साकारले. ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’ आणि ‘चुपके चुपके’ सारख्या चित्रपटांत त्यांनी नाजूक भावना आणि मृदू स्वभावाचे दर्शन घडवले. हा चतुरस्रपणा हीच त्यांच्या अभिनयातील खरी ताकद होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी दमदार संवादफेक हेही त्यांचे गुणवैशिष्ट्य ठरले. ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’ हा ‘शोले’तील संवाद आजच्या काळातही लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे ‘यह हात नहीं हातोडा है’ यांसारखे अनेक संवाद कानावर पडताच धर्मेंद्र यांचा पोलादी नायक डोळ्यांपुढे उभा राहतो.