भोर : भोर शहरातील मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर इव्हीएम मशीन भोर शहराच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या सरदार कान्होजी जेधे शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या गोदामात स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवल्या आहेत. या मशीनमध्ये उमेदवारांचे भविष्य बंद अवस्थेत आहे. या मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी भोर पोलिसांवर आहे. या ठिकाणी दिवस रात्र जागता पहारा ठेवण्यासाठी १६ पोलीस कर्मचारी व सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हा पहारा स्ट्रॉंग रूमच्या पुढील बाजूस व मागील बाजूस आहे. स्ट्रॉंग रूम सीसीटीव्हीच्या नजर कक्षेत असून राजकीय पक्षांची इव्हीएम मशीनला छेडछाड होऊ नये यासाठी पुढील व पाठीमागील बाजूस १६ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्क्रीन बसवली असून या स्क्रीनमध्ये सर्व सीसीटीव्हीतील दृश्य दिसणार आहेत. सीसीटीव्हीतील दृश्य स्क्रीनवर पाहण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मुभा दिलेली आहे. स्ट्रॉंग रूमच्या आत मध्ये निवडणूक आयोगाचा एक कर्मचारी असून निवडणूक आयोगाचा अधिकारी वेळोवेळी भेट देणार आहे. इव्हीएम मशीनची छेडछाड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने योग्य ती काळजी व खबरदारी घेतली आहे. तर कुणाचीही खैर नाही भोरमध्ये इव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर वेळोवेळी भेट देत असून शुक्रवारी अकरा वाजता भेट दिली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना स्ट्रॉंग रूम परिसरात बारकाईने नजर ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच परिसरात कुणालाही प्रवेश देऊ नये अशा सूचना राजेंद्रसिंह गौर यांच्याकडून करण्यात आल्या. याबाबत पोलिसांकडून निष्काळजीपणा करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास कुणाचीही खैर केली जाणार नाही, अशा कडक शब्दात गौर यांनी पोलिसांना सुनावले.