इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (2 डिसेंबर) झालेल्या मतदानात शहरातील 27 मतदान केंद्रांवर दिवसाभरात काही किरकोळ वादविवाद वगळता प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळपासूनच दोन्ही प्रमुख पॅनेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि कृष्णा भीमा विकास आघाडी-यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या-आपल्या बुथवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत वातावरण तापवून ठेवले होते. पद आणि दहा प्रभागांतील एकूण 20 नगरसेवक निवडीसाठी पार पडणार्या या निवडणुकीत सकाळपासून मतदारांची मोठी गर्दी दिसून आली; मात्र दुपारी प्रभाग क्रमांक 5 मधील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये वादावादी झाली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाचीचा प्रकार घडला.काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरी पोलिसांनी वेळीच नियंत्रण आणत मतदान सुरळीत सुरू ठेवले. सायंकाळी मतदानाला वेग आल्याने केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. मतदानाची वेळ संपताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि कृष्णाभीमा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमचाच विजय निश्चित असा जोरदार नारा देत फटाक्यांची आतषबाजी करून शक्तीफेक केली. इंदापूरकरांचा विश्वास आमच्या नेतृत्वावर -शहा नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत शहा यांनी नारायणदास रामदास हायस्कूल मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विकासदृष्टीवर इंदापूरकरांनी मनापासून विश्वास ठेवला आहे. या नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा निश्चितच फडकेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णा भीमा आघाडीला पाठबळ – गारटकर कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनीही मतदान करून आवाहन केले. ते म्हणाले, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने तसेच सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या नेतृत्वाखालील सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आमचे पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा त्यांनी केला. निकाल पुढे ढकलल्याने वातावरणाला ‘ब्रेक’ नगरपरिषदेचा निकाल पुढे ढकलल्याने राजकीय तापमानात अचानक शांतता झाली आहे. अचानक आलेल्या या निर्णयामुळे गेल्या आठवडाभरापासून तापलेल्या राजकीय वातावरणाला अचानक विराम मिळणार आहे. दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते एकीकडे विजयाचा दावा करत असतानाच प्रत्यक्ष निकालाची प्रतिक्षा अधिकच चुरशीची बनली आहे. इंदापूरच्या राजकारणात अभूतपूर्व असा सामना रंगला असताना, निकाल जाहीर होईपर्यंत शहरातील राजकीय घडामोडी नेमक्या कोणत्या वळणावर जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.