जामखेड : जामखेड येथे फायरींग करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणात अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, कोयते तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी श्री. रोहित अनिल पवार (रा. जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जामखेड रोडवरील एका हॉटेलजवळ आरोपींनी जाणूनबुजून फायरींग करून भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद होते. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी (स्थानीय गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड, आष्टी परिसरात सापळा रचून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून जप्त मुद्देमाल देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतुसे कोयता रोख रक्कम – सुमारे ५० हजार रुपये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच भारतीय शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करीत आहे. या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी – पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार व पथकातील सदस्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.