Vladimir Putin In India : भारत आणि रशिया यांच्यात फार पूर्वीपासून अनेक आघाड्यांवर सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. पंतप्रधान मोदींनी भारताचे हे परराष्ट्र धोरण कायम राखले. हे नाते फक्त ऐतिहासिक नव्हे, गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत आणि आधुनिक झाले आहे. आता दोन्ही देशांनी उच्च-तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या पिढीच्या तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढवले आहे. ही भागीदारी केवळ कूटनीती नाही, तर खऱ्या प्रगतीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. यावेळी दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताची भूमिका मांडली. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. दोन्ही नेत्यांत झालेल्या बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर, संतुलित आणि जबाबदार भूमिका घेतली आहे. आम्ही भारताच्या या भूमिकेला खऱ्या अर्थाने महत्त्व देतो आणि याला शांती प्रक्रियेतील सकारात्मक योगदान मानतो. यावेळी मोदी म्हणाले, दहशतवादाविरोधातील लढाईत भारत आणि रशियाने दीर्घकाळापासून खांद्याला खांदा लावून सहकार्य दिले आहे. भारताची भूमिका कायम शांततेच्या बाजूने आहे. जागतिक नेत्यांशी चर्चा करत असताना आमची ही भूमिका वेळोवेळी मांडत आलो आहे. जगाने आता शांततेच्या मार्गावर परतले पाहिजे. आम्ही शांततेच्या प्रत्येक प्रयत्नांना पाठिंबा देऊ. युक्रेन संघर्षात भारत तटस्थ नाही. भारत शांततेच्या बाजूने आहे. भारत-रशिया संबंध अधिक दृढ होऊन त्याने नवी उंची गाठायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारताने रशियन लोकांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुरू केला आहे. हा ई-व्हिसा ३० दिवसांसाठी वैध असेल. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील पर्यटन आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे. ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात भारत-रशिया भागीदारी मजबूत आणि महत्त्वाचा स्तंभ राहिला आहे. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात आपले दशकांहून जुने सहकार्य, स्वच्छ ऊर्जेप्रती आपल्या सामायिक प्राधान्यक्रमांना सार्थकी लावण्यात महत्वाचे ठरले आहे. मनुष्यबळाची गतिशील देवाणघेवाण, आपल्या नागरिकांना जोडण्यासोबतच दोन्ही देशांसाठी नवी ताकद आणि नव्या संधी निर्माण करेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान