कोलकाता – कोलकात्यातील गीता पठण कार्यक्रमात दोन मांसाहारी खाद्यविक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हे पश्चिम बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. अशा धमक्या, हिंसा आणि धर्माच्या नावावर दडपशाही येथे चालणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी ठाम शब्दांमध्ये सांगताना, धर्माचा खरा अर्थ संरक्षण आहे, विभागणे नाही. गीता हे राजकारणाचे हत्यार नाही, याचा वापर करू नये, असा स्पष्ट इशाना केंद्र सरकारला दिला. गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन कोलकातामध्ये करण्यात आले होते. यावेळी दोन विक्रेत्यांनी मांसाहारी पदार्थ विकण्यासाठी आणले होते. त्यांना पकडण्यात आल्यानंतर उपस्थितांनी त्यांनी आणलेले मांसाहारी पदार्थ फेकून दिले व दोन्ही विक्रेत्यांना शिक्षा म्हणून उठा-बशा काढायला लावल्या होत्या. यावरुनच ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर टीका केली आहे. नदिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना रातोरात अटक करण्यात आली आली असल्याचे सांगितले. अशा प्रकरणांमध्ये भाजप सत्ताधारी असलेल्या राज्यांमध्ये धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा खेळ करत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्या म्हणाल्या की, लोक देवावर आपल्या मनातून श्रद्धा ठेवतात. गीता वाचण्यासाठी राजकीय सभा कशाला? हे सगळे बंगालची संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करताना, बंगाल सर्वधर्मीय ऐक्याचं प्रतीक आहे. येथे भय निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही मोडून काढू असा थेट इशारा देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिला.