Employees DA : छत्तीसगड राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणेच महागाई भत्ता (DA) देण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. यानुसार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून वाढवून ५८ टक्के करण्यात आला असून, हा वाढीव भत्ता कर्मचाऱ्यांना लागू केला जाणार आहे. ही घोषणा छत्तीसगड राज्य कर्मचारी संघटनेच्या आठव्या राज्य अधिवेशनात करण्यात आली. राजधानी रायपूर येथे रविवारी (दि. ११) आयोजित या अधिवेशनात मुख्यमंत्री साई यांनी राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सोशल मीडियावरही यासंदर्भातील माहिती शेअर केली. ‘X’ या सोशल मीडिया मंचावर त्यांनी नमूद केले की, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या समान लाभांची खात्री करण्यासाठी राज्यातील महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री साई म्हणाले की, छत्तीसगडचे अधिकारी आणि कर्मचारी हे शासन व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांची प्रामाणिकता, समर्पण आणि सेवेची भावना हीच सुशासनाची खरी ताकद आहे. सरकार प्रत्येक पावलावर कर्मचाऱ्यांच्या सन्मान आणि कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.