Pune District : मेरीलँड विद्यापीठात वारीवरील प्रबंधाला जागतिक मान्यता
Pune District : हा नमुना वारी मार्गावरील इतर पालखी तळांवरही स्थानिक गरजांनुसार सहजपणे विकसित करता येऊ शकतो.

आळंदी : महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे प्रतीक असलेल्या वारी या विषयावर सादर करण्यात आलेल्या संशोधन प्रबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची दखल मिळाली आहे. अंकिता सुरेश येवले-सायणकर यांनी अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील जागतिक कीर्तीच्या सार्वजनिक संशोधन विद्यापीठ ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड येथे’ “Wari: A Sacred Journey” या विषयावरील आपला प्रबंध यशस्वीरीत्या सादर केला असून, विद्यापीठाने तो आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे.
या प्रबंधाचे मार्गदर्शक प्रा. रोनित आयसेनबाक (Ronit Eisenbach) यांनी संशोधनाला दिशा दिली आहे. प्रबंधात सामुदायिक स्वयंपाकघर, धुण्याचे अंगण, बहुउद्देशीय सभागृह, खुली वर्गखोली, ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी सामुदायिक अतिथीगृह, सावलीयुक्त पायवाटा, पडव्या (व्हरांडे), ओटे (प्लिंथ) तसेच भक्तीमय सामुदायिक संमेलनासाठी स्वतंत्र जागा अशा विविध सुविधांचा समावेश असलेला अभिनव आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रबंधाचा विशेष निष्कर्ष असा आहे की, केवळ वारीपुरत्या तात्पुरत्या सुविधा उभारण्याऐवजी वर्षभर समाजाच्या विविध गरजा पूर्ण करणारा लवचिक आणि सर्वसमावेशक सार्वजनिक आराखडा विकसित करणे अधिक परिणामकारक ठरेल. हा नमुना वारी मार्गावरील इतर पालखी तळांवरही स्थानिक गरजांनुसार सहजपणे विकसित करता येऊ शकतो.
मागील वर्षी वारीदरम्यान विविध वारकरी, स्थानिक नागरिक, अभ्यासक आणि सहकाऱ्यांनी दिलेले मार्गदर्शन, सहकार्य आणि माहिती या संशोधनासाठी आळंदी देवस्थान सर्व ट्रस्टी, आळंदीतील सर्व पत्रकार व आळंदी येथील अविनाश कुलकर्णी यांची मदत अत्यंत मोलाची ठरली. या सर्वांच्या सहकार्याबद्दल अंकिता येवले-सायणकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय दृष्टीनेही अभ्यासाचा महत्त्वपूर्ण विषय असल्याचे या संशोधनातून अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्राच्या या वैभवशाली परंपरेला जागतिक शैक्षणिक स्तरावर मिळालेली ही दखल राज्यासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
संशोधनाचा मुख्य उद्देश
वारी मार्गावरील पालखी तळांच्या परिसरात बहुउद्देशीय संरचनांची संकल्पना मांडणे हा आहे. ज्या वारीच्या काळात लाखो वारकऱ्यांसाठी निवास, स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील आणि उर्वरित ३६४ दिवस स्थानिक नागरिक, शाळा, मंदिरे व सामाजिक उपक्रमांसाठी उपयुक्त सार्वजनिक जागा म्हणून वापरता येतील.





