Mumbai Municipal Corporation Election : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आज प्रचाराचा अंतिम दिवस असून, सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार थांबणार आहे. अशातच आता गेल्या काही दिवसांपासून अलिप्त असणारे मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी शेवटच्या टप्प्यात उमेदवांरांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत एक वेगळीच रंगत आल्याचे दिसून आले. उद्धवसेनेसाठी बॅालिवूड अभिनेत्री रविना टंडन मैदानात उतरली आहे. महायुतीसाठी मराठमोळा सर्वांचा लाडका कॅामेडी कलाकार भाऊ कदम सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अभिनेता गोविंदाने देखील कामाठीपुरा भागात खुल्या जीपमधून प्रचार करत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकरने हिने देखील विक्रोळीतील महिला उमेदवाराच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. रवीना ठरली विशेष आकर्षण मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येतील यासाठी राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना कलाकार मंडळींची देखील साथ लाभली आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून उद्धवसेनेच्या उमेदवार अक्षता मेनझेस यांच्या प्रचारासाठी रविवारी चिंबई ते कांतवाडी परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत अभिनेत्री रविना टंडन विशेष आकर्षण ठरली. या निवडणुकीत काही मनोरंजन विश्वातील कलाकार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून उद्धवसेनेच्या उमेदवार अक्षता मेनझेस रिंगणात आहेत. थोडक्यात रोड शोमध्ये सहभागी होऊन जी प्रचार मोहिम राबविली जात आहे. त्यामध्ये ही कलाकर मंडळी उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यानंतर १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता आज किती कलाकार प्रचाराला येतील हे बघणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “आधुनिक सुविधा, गुप्त बोगदा…” ; ७७ वर्षांनंतर पीएमओचा पत्ता बदलणार, जाणून घ्या काय असेल खास?