तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले. विविध राजकीय पक्षांकडून संभाव्य इच्छुक उमेदवारांची नावे आता उघडपणे चर्चेत येऊ लागली आहेत. तळेगाव गटात सत्तासंघर्षाची नांदी सुरू झाली आहे. त्यामुळे गटात प्रस्थापित आणि दिग्गजांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), भाजप, अशी चौरंगी लढती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. प्रबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून सारिका राहुल करपे यांचे नाव आघाडीवर असून, गटात त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून दीपाली राहुल गव्हाणे, रेश्मा जयेश शिंदे ही दोन नावे चर्चेत असून भाजप अंतर्गत चुरस वाढताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून रेखा मंगलदास बांदल यांनीही गटात उपस्थिती ठळक केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांतील राजकीय गणिते रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) कडून चेतना जयकुमार ढमढेरे यांचे नाव पुढे येत असून उबाठाकडून ही लढत गांभीर्याने लढण्याच्या तयारीत सुरू आहे. बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या असून बैठका, मतदार संपर्क, पडद्यामागील रणनीतींनी गटातील राजकारणाची धग आणखी वाढली आहे. कोणाला उमेदवारी, कोण बंडखोरीच्या वाटेवर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेची घोषणा केल्यानंतर तळेगाव गटात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ही निकाराची लढाई प्रस्थापित नेत्यांमध्ये होणार असल्याने संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. तळेगाव गटात राजकीय संघर्ष आणि अस्तित्वाची ठिणगी पेटली आहे. चार दिवसांत गटात राजकीय घडामोडीला वेग येणार आहे. तळेगाव ढमढेरेकरांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोण मैदानात उतरणार याची चर्चा सुरू झाली आहे. तालुका, जिल्हा पातळीवर पदाधिकारी शर्यतीत तळेगाव ढमढेरेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, कात्रज दूध संघाचे चेअरमन स्वप्निल ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला तालुकाध्यक्षा आरती भुजबळ, उपाध्यक्ष महेश ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका महिला अध्यक्षा विद्या भुजबळ, भाजप नेते शिवाजीराव भुजबळ, राजेंद्र भुजबळ हे सर्व नेते तळेगाव ढमढेरेचे रहिवासी असून जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी योगदान असणारे म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर तळेगाव गटात राजकीय हालचाली वेग घेत असताना प्रबळ नेत्यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला आहे. मात्र सर्व नेत्यांनी अद्याप आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. कोण कोणत्या पक्षासाठी सक्रिय होणार, कोण कोणाला ताकद देणार आणि कोण थेट मैदानात उतरणार, याबाबत केवळ तर्कवितर्कच सुरू आहेत. प्रबळ नेत्यांची एकत्रित भूमिका तळेगाव गटातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलू शकते, हे लक्षात घेता त्यांची पुढची चाल काय असेल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बंडखोरी उमेदवार लक्ष वेधणार तळेगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भाजपात प्रबळ, निष्ठावंत इच्छुक उमेदवारांची नावे शर्यतीत आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. बंडखोरी रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही बंडखोरी राष्ट्रवादी आणि भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठी कोणता मध्यम मार्ग काढून मनधरणी करतात, याचे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.