ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. एकसंध शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भरघोस यश मिळवत ७५ जागांवर विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, युतीतील भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालातून ठाण्यात शिंदेसेनेचीच हवा असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी येत्या काही दिवसांत भाजप-शिंदेसेना युतीत तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच युती तुटण्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर शिंदेसेनेकडून महापौरपदाची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, ठाण्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी थेट सूचक इशारा देत, “योग्य मान-सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार केला जाईल,” असे वक्तव्य केले आहे. तसेच, “उचित सन्मान न मिळाल्यास विरोधी बाकावर बसण्याचीही तयारी आहे,” असं म्हणत त्यांनी युतीतील अस्वस्थता उघडपणे मांडली. सत्तेत सहभागी असतानाही अंकुश ठेवणे महत्त्वाचे असते, त्यामुळे ठाण्यात वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे ठाण्यात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युती टिकणार की तुटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.