Ravindra Chavan : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका करत भष्ट्राचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या या आरोपांना आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, थेट इशारा दिला आहे. अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, अशा शब्दांत चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुढे ते म्हणाले, खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, असा थेट इशारा देत याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून, आरोप प्रत्यारोपाचे राजकारण भाजप राष्ट्रवादीमध्ये सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या आरोपांनंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात स्थानिक निवडणुकांवर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे, अशी चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपसाठी पुणे महापालिका निवडणूक आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाच्या आहेत. यावर भाष्य करताना रवींद्र चव्हाण यांनी यंदाची निवडणूक ही पुण्याच्या विकासासाठी आहे. येथील जनतेला नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकते, याचा प्रश्न आहे. हेच सांगायला मी इथे आलो आहे, असे ते म्हणाले. मोदींचे सरकार आल्यावर मेट्रो सुरू झाली पुण्यात गतिमान पद्धतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहे. पायाभूत प्रकल्पांची कामं वेगाने केली जात आहेत. कोट्यवधी रुपये दिले जात आहेत, अशी माहिती देत पुणे मेट्रोचा ठराव महापालिका झाला, त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही, असा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला. मोदींचे सरकार आल्यावर पुण्यात मेट्रो सुरु झाली, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये SIR वरून निवडणूक आयोग-टीएमसीत वाद वाढला ; न्यायालयाच्या उंबरठ्यावर प्रकरण