बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याचा माज जिल्हा कारागृहातही कायम असल्याचे समोर येत आहे. कारागृहातील एका कर्मचाऱ्याला या आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बाबा कवठे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, कराड गँगची कारागृहात दादागिरी सुरू असल्याचा आरोप होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. या प्रकरणात वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. आरोपींनी कारागृहातील कर्मचारी बाबा कवठे यांना धमकी दिल्याने कारागृह प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करून हे प्रकरण उघडकीस आणले असून, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कराड गँगमधील संदीप तांदळे याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, बीडचे आमदार सुरेश धस आणि बाळा बांगर यांच्याविरोधात अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वाल्मीक कराड जेलमध्ये असला तरी त्याच्या गँगची दहशत कायम असल्याचे दिसते. वाल्मीक कराड लवकरच तुरुंगातून बाहेर येणार असल्याची चर्चा असून, राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय बाजीराव धर्माधिकारी यांचे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग याला कारणीभूत ठरले होते. याशिवाय, कराडच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला गँगच्या समर्थकांनी मारहाण केली होती. तक्रार दाखल करूनही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, असा प्रकारही घडला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायप्रविष्ट असून, आरोपींविरोधात मोक्कासह गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. कारागृहातील या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.