पुणे – मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करत, पुण्यात आयोजित करण्यात आलेला दोन दिवसांचा साहित्यिक महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटीलयांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करून या महोत्सवाची सुरुवात झाली. पुण्यातील नांदेड सिटीमधील मंगलभैरव सोसायटी आयोजित ‘पुस्तकमैत्री’ महोत्सव आयोजित केला होता. यंदा कार्यक्रमाचे तिसरे वर्ष होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक नितीन थोरात, लेखक-कवी देवा झिंजाड, अभिषेक अवचार, राजेश मंडलिका, प्रियंका चौधरी आणि उद्योजक सोनम सूर्यवंशी (आर्यन ज्वेलर्स) राहुल पोकळे आणि अविनाश लगड (युथ फाउंडेशन चे अध्यक्ष) यांची उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी बोलताना विश्वास पाटील यांनी मराठी साहित्याची जपवणूक आणि वाचन संस्कृती वाढवण्यावर भर दिला. बालकांपासून थोरांपर्यंत सांस्कृतिक मेजवानी महोत्सवाच्या दोन्ही दिवसांत विविध वयोगटांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते: पहिल्या दिवशी घोषवाक्य आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धांनी रंगत आणली. तर दुसऱ्या दिवशी चित्रकला, वक्तृत्व आणि मराठी साहित्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा पार पडली. तर संजय ऐलवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बालकवी संमेलनात लहानग्यांच्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी गीतगायन, सांगीतिक जुगलबंदी आणि बालनाट्य प्रयोगांनी कार्यक्रमात चैतन्य भरले. Vishwas Patil, Nanded City ‘कॉमनमॅनच्या कविता’ ठरले मुख्य आकर्षण महोत्सवाचा दुसरा दिवस कवी संमेलनाने विशेष गाजला. सागर रामचंद्र काकडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कवी नीलेश खडके, श्वेता बरकडे, गिरीश जंगमे, दिनेश कांबळे, वैभव जावळे, सुरेश धोत्रे, अतुल दुधाने आणि कुमार चव्हाण यांनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. रात्री १० वाजता सामूहिक ‘पसायदान’ म्हणून या महोत्सवाचा समारोप झाला. प्रायोजकांचे सहकार्य या भव्य उपक्रमाचे मुख्य प्रायोजक बन्सल क्लासेस (Bansal Classes) हे होते, तर आर्यन ज्वेलर्स यांनी सह-प्रायोजक म्हणून मोलाची भूमिका बजावली. या महोत्सवाला साहित्यप्रेमींचा आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे. माझं पाखरू’ नाटकाचा प्रयोग ‘माझं पाखरू’ या नाटकाचा विशेष प्रयोग सादर करण्यात आला, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे आयोजित केलेले ‘कवी संमेलन’. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत, सर्व वयोगटातील कवींनी सहभाग नोंदवला होता. सहभागी कवींनी आपल्या कवितांमधून विविध विषयांवर भाष्य करत उपस्थितांची मने जिंकली. नांदेड सिटीमधील रहिवाशांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि सांस्कृतिक वारसा जपला जावा, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच या कलाविष्काराचा आनंद लुटला.