Ajit Pawar – महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही वर्षांनापासून प्रलंबित होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2017 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी झाली. या स्थानिक निवडणूकीतही महायुतीने विधानसभेत मिळवलेले घवघवीत यश कायम राखले. तर महाविकास आघाडी या निवडणुकीतही कमबॅक करण्यात अयशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्या पक्षांसाठी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. याचा सकारात्मक परिणाम या निकालांमध्ये दिसत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये देवाभाऊंचेच वर्चस्व पाहायला मिळाले असून तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेटसुद्धा तगडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केला होता. भाजपचे 1२0 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपची ही राज्यातील आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेने भाजप, शेकापच्या पॅनेलला पराभूत केले. कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवेसना पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तसेच सोलापूरमध्ये 6 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जिंकले आहेत. नाशिकमध्ये 11 पैकी 5 ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झालेत. पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू येथे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर आणि पाचगणीत नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. कोल्हापूर, बीड जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 34 नगरपरिषद आणि नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. अहिल्यानगर, कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 7 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उरुण ईश्वरपूर, आष्टा नगरपालिकेत पक्षाने यश मिळवले. रायगडमधील उरण येथे देखील राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर विजयी झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजाने राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर जनतेच्या विश्वासाची, विकासाच्या दिशेने घेतलेल्या वाटचालीची आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री (राष्ट्रवादी कॉंग्रेस)