Weather Alert : महाराष्ट्रात सध्या थंडीचे वातावरण आहे आणि हा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निफाड येथे राज्यातील सर्वात नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील भागांत थंडीचा जोर कायम आहे. राज्याच्या इतर भागांतही तापमानात घट होत असून, २३ डिसेंबर रोजीही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत तापमानात किंचित घट मुंबईत तापमानात किंचित घट जाणवत आहे. २३ डिसेंबरला कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. दिवसभर धुके आणि आंशिक ढगाळ आकाशाची शक्यता आहे. कोकणातील इतर भागांतही थंडीची हीच स्थिती कायम राहील. पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. सकाळी धुके आणि आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. इतर शहरांतही हुडहुडी भरवणारी थंडी जाणवेल. मराठवाड्यात गारठ्याची लाट कायम मराठवाड्यात गारठ्याची लाट कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळी धुके पडून नंतर मुख्यतः निरभ्र आकाश राहील. इतर भागांतही थंडीची तीव्रता समान राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सर्वाधिक घसरला आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. दिवसभर धुके राहण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये ७ अंश आणि जळगावमध्ये १० अंशांच्या खाली तापमान नोंदवले गेले आहे. इतर जिल्ह्यांतही कडाक्याची थंडी जाणवत राहील. विदर्भात थंडीचा जोर कायम विदर्भात थंडीचा जोर कायम आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. मुख्यतः निरभ्र आकाश आणि सकाळी गारठा, तर दुपारी उन्हाचे चटके सोसावे लागतील. गोंदिया आणि इतर भागांतही तापमान १० अंशांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. राज्यात एकूणच तापमान घसरण्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घालणे, जास्त थंडी असताना बाहेर पडणे टाळणे आणि वृद्धांसह लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.