मुंबई : महानगरी मुंबईचा नवा महापौर कोण याविषयीचा सस्पेन्स दिवसागणिक वाढतच आहे. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अतिशय सूचक वक्तव्य केले. त्यामुळे शिंदेसेनेने थेट नसला; तरी अप्रत्यक्षपणे त्या पदावर दावा केल्याचे चित्र समोर आले. त्यातून भाजप आणि शिंदेसेनेत मोठी राजकीय रस्सीखेच होण्याची शक्यता बळावली आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, अशी ग्वाही शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुठली नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. भाजप आणि आम्ही मुंबईत महायुती म्हणून निवडणूक लढवली. त्यामुळे महायुतीचा उमेदवार महापौर बनेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. मात्र, त्यांनी जोडलेल्या पुस्तीतून वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष २३ जानेवारीपासून सुरू होईल. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बनावा अशी भावना शिवसैनिकांमध्ये आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदेसेनेला महापौरपदाची आस असल्याचे सूचित झाले. मुंबई महापालिका निवडणुकीला भाजप आणि शिंदेसेना हे राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष एकत्रितपणे सामोरे गेले. महायुतीने निवडणुकीत बाजी मारत मुंबई जिंकली. अर्थात, महायुतीला मिळालेले बहुमत काठावरचेच ठरले आहे. त्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेला एकमेकांची मदत अपरिहार्य बनली आहे. मुंबई पालिकेचे एकूण संख्याबळ २२७ आहे. त्यातील भाजपने ८९, तर शिंदेसेनेने २९ जागा जिंकल्या. मोठा पक्ष या नात्याने भाजपचाच महापौर निश्चित असल्याचे निवडणूक निकालानंतर मानले गेले. मात्र, शिंदेसेनेने आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यातून पहिल्या अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद मिळवण्यासाठी शिंदेसेना उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.