मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा राज्यभर थंडीची लाट येण्याचे संकेत मिळाले असून 9 जानेवारीपासून गारठा अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना विशेष थंडीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत धुक्याची दाटी दिसू शकते. मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 19 ते 21 अंशांपर्यंत घसरू शकते. समुद्राच्या प्रभावामुळे तीव्र थंडी जाणवणार नसली तरी पहाटे गार हवा आणि गारठा नागरिकांना जाणवेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अशीच हवामानस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात पहाटे गारवा जाणवेल. दुपारी सूर्यप्रकाशामुळे तापमानात थोडी वाढ होईल, मात्र रात्री पुन्हा थंडी वाढेल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका अधिक तीव्र राहणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर भागांत किमान तापमान 10 ते 13 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील, मात्र सकाळी धुके आणि रात्री गारठा जाणवेल. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर परिसरात किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून थंडीचा जोर कायम राहणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामानात फारसा मोठा बदल होणार नाही, असा अंदाज आहे. सकाळी धुके, रात्री गारवा आणि दिवसा हलका उबदारपणा अशीच स्थिती राहणार आहे. मुंबई-पुण्यासह बहुतांश भागांत थंडीचा प्रभाव टिकून राहील, मात्र अचानक तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे.