मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले असतानाच अशी एक घटना घडली आहे की ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदेंच्या शिवसेनेला ५० खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्याचे याअगोदर पाहायला मिळाले होते. आता चक्क सत्तेतीलच भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेविरोधात ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती झालेली नाही. पण मुंबईसाठी दोन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले आहेत. निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असतानाच अशा प्रकाराची घोषणाबाजी मित्रपक्षाच्या विरोधात केली जात असल्याचा आरोप होत असून, याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सकाळी वॅार्ड क्रमांक १७३ मध्ये ही घटना घडली आहे. या वॅार्डात भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. भाजपकडून शिल्पा केळुस्कर आणि शिवसेनेकडून पूजा कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरुन ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देत शिंदे गटाला डिवचलं. त्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते देखील संतापले. त्यांनीही भाजपविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकाराविषयी शिंदे गटाचे नेते मत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांनी घोषणा दिली त्यांची भाषा कुठे गेली ते बघा, याबद्दल फडणवीस दखल घेतील, अशी अपेक्षा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. तर भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या घोषणेबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हेही वाचा : Acupressure Therapy: तणाव दूर करण्याचा सोपा आणि नैसर्गिक मार्ग