कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असा माझा प्रामाणिक हेतू होता. या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. त्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूरात महापालिकेत महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनचा मोठा वाटा आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी, यासाठी सुरवातीपासून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न होता. या महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा मिठाचा खडा पडू नये, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच, जागा वाटपातही शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. उत्तरची सर्व पेठ शिवसेनेबरोबर होती ते विधानसभेत पाहिले. तेच आता महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या 26 शिवसेनेच्या 14 राष्ट्रवादी 4 आणि जनसुराज्य एक अशा 46 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करु. 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभररावी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची ती आज पूर्ण होत आहे. कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार असल्याचे ते म्हणाले.