मुंबई : राज्यभरात प्रचंड राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या, अत्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या २९ महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणावरील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. विशेषत: सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले. प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले. सर्वांधिक ठिकाणी बाजी मारत भाजपने उत्साहात विजयाचा गुलाल उधळला. तो पक्ष राजकीय रणसंग्रामाला सामोऱ्या गेलेल्या अनेक शहरांचा कारभारी बनला. यावेळच्या निवडणुकांत मुंबईची लढत सर्वांत लक्षवेधी ठरली. त्या महानगरीच्या निवडणुकीतही भाजपने शिंदेसेनेच्या मदतीने लक्षणीय कामगिरी करत सत्ताबदल घडवला. त्यातून भाजपच्या झंझावातापुढे ठाकरेब्रँडही निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. राज्यात विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या पक्षांची राजकीय घसरण आताच्या निवडणुकांतही कायम राहिली. केवळ विरोधकांचा विचार करता कॉंग्रेसची कामगिरी तुलनेने समाधानकारक ठरली. मागील अनेक वर्षे राज्याच्या राजकारणावर पवार आणि ठाकरे या राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले. मात्र, त्या घराण्यांच्या प्रभावाला आताचे निकाल आव्हान देणारे ठरले आहेत.