नवी दिल्ली – महाराष्ट्रात सध्या जे काही चालले ते भीषण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पारदर्शक कारभाराचा दावा करत असतात. पंतप्रधान मोदी सतत आश्वासन देत असतात की, आम्ही देशताला सगळा काळा पैसा हद्दपार करू आणि भ्रष्टाचारमुक्त भारत करू. विशेष म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात भाजपाचं व त्यांच्या विचाराचं सरकार आहे. तरी या सरकारमध्ये पाण्यासारखे पैसे वाटले जात आहेत, सरकारचं प्राधान्य केवळ प्रचाराला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र डागले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदी केली होती. काळा पैसा रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र तरी देखील महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा कुठून येतात? दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एका मंत्र्यांच्या (संजय शिरसाट) घरात पैशाने भरलेली बॅग सापडली होती. त्याची चौकशी झाली का? चौकशी केली असेल तर ते पैसे कुठून आले होते हे समजलं का? काल एका ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीत मतदारांना वाटले जाणारे पैसे पकडले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांनी हा प्रकार सर्वांसमोर आणला. त्यामुळे मी संसद परिसरात मंत्री नारायण राणे यांना भेटले, तेव्हा त्यांच्याजवळ मी निलेश राणे यांचं कौतुक केलं. तुमच्या मुलाने चांगलं काम केलं. तुमच्या मुलाने मोठी हिंमत दाखवली म्हणून चोरी पकडली, असं मी त्यांना सांगितलं. परंतु आता निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब खूप दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.