प्रभात वृत्तसेवा पुणे : औंधपासून खडकी पोलिस स्टेशनदरम्यानच्या रस्त्यावर अनेक समस्या असल्याने येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ता सुनील माने यांनी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली होती. या कामासाठी केंद्राच्या सेतुबंधन योजनेतून निधी देण्यास गडकरी यांनी तयारी दर्शवल्याचे माने यांनी सांगितले. माने म्हणाले की, खडकी पोलिस स्टेशनजवळ ब्रिटिशकालीन रेल्वे पूल असून त्याखालून जाण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुण्यात ये-जा करणारे तसेच खडकी, कोरेगाव पार्क, विमाननगर, येरवडा, नगररोड या भागांत जाणारे हजारो नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात. पुणे स्टेशनवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी खडकी येथे रेल्वे स्टेशन विकसित करण्यात आले आहे. भविष्यात अनेक गाड्या या मार्गावरून सोडल्या जाणार असून या स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार याच अरुंद रस्त्यावर असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारणे अत्यावश्यक असल्याचे माने यांनी सांगितले.