BMC Election 2026 – मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ जागेसाठी गुरुवारी मतदान पार पडले असून १७०० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनध्ये बंद झाले आहे. या निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे बंधू यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूण १,०३,४४,३१५ मतदार संख्या असलेल्या या महानगरीत ५५,१६,७०७ पुरुष मतदार ४८,२६,,५०९ महिला तसेच १,०९९ इतर मतदार संख्या आहे. मतमोजणी १६ जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून २३ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे भाजप महायुती की ठाकरे बंधु यांच्या युतीवर संक्रात कोसळली हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर आवश्यक सोय़ी, सुविधा उपलब्ध आहेत. मतदान प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती पालिका आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. मतदारांच्या तक्रारींकडे विलबाने लक्ष सकाळी सव्वानऊच्या सुमारास एका शिवसैनिकाने बोटावरची निशाणीची शाई पुसली जात असल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. परंतु त्याकडे रिटर्निंग अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. परंतु मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लिखीत तक्रार प्राप्त होताच त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देत शाई पुसण्याविषयी आपल्याकडेही तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले. यादरम्यान, शहरातील काही भागातून तक्रारी वाढल्यानंतर अखेरीस केंद्रीय निवडणूक आयोगावर राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी खापर फोडून हात झटकले. पोलीस बंदोबस्त चोख, तरीही वाद मुंबईत निवडणूक शांततेत पार पडली. दोनचार किरकोळ दुबार मतदानाच्या प्रयत्नाचे किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान व्यवस्थित पार पडले. तथापि काही ठिकाणी पोलीस व मतदारांत मतदान केंद्रावर वाद होतानाचे प्रसंग दिसले. यावेळी स्थानिक स्वयसेवकांनी मध्यस्थी करून ते वाद मिटवले. शहराच्या संवेदनशील भागात मतदानाच्या काळांत तणावाचे प्रसंग पोलिसांनीही शिताफीने वेळीच हस्तक्षेप करून वाद टाळले.