Election News – नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकांत सत्ताधारी पक्षांनी घवघवीत यश मिळवले. मात्र, त्या निकालावर विरोधकांनी अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोग, धनशक्ती आणि इव्हीएम सेटिंगच्या बळावर सत्ताधाऱ्यांनी वर्चस्व मिळवले, अशा प्रतिक्रिया विरोधकांच्या गोटातून देण्यात आल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निकालाविषयी उपरोधिक टिप्पणी केली. त्यांनी सत्ताधाऱ्यांना मदत केल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले. ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत बोचरी प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणूक आणि आताच्या निवडणुकांतील निकालांचे आकडे सारखेच आहेत. बहुधा इव्हीएम सेटिंग तसेच आहे. सत्ताधाऱ्यांचा विजय विचारांचा नसून पैशांचा आहे, असे त्यांनी म्हटले. ठाकरेसेनेचे आणखी एक नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांनी धनशक्ती आणि मनगट शक्तीच्या जोरावर यश मिळवल्याचा आरोप केला. आताच्या निकालाचा परिणाम महापालिकांच्या रणसंग्रामावर होणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.