नागपूर : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घर व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात ईडीची जोरदार छापेमारी सुरू असून, नागपूर व दिल्ली येथील ईडीच्या १० पथकांकडून ही कारवाई केली जात आहे. पहाटे ५ वाजल्यापासून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही कारवाई २०२१ मधील रेती तस्करी आणि बेकायदेशीर रेती विक्री प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती विक्रीत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून ही छापेमारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सावनेरमध्ये प्रफुल्ल कापसे, उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते आणि दादू कोलते, तर पाटणसावंगी येथे शरद राय, मनोज गायकवाड आणि खापा येथे अमित राय यांच्या घर व कार्यालयांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर ईडीची कारवाई झाल्याने छापेमारीच्या टायमिंगवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असून, या प्रकरणात ईडी पुढे काय कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.