Raj Thackeray – महानगरपालिका निवडणुकांचा अधिकृत प्रचार कालावधी संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. हा निर्णय सत्ताधारी महायुतीला निवडणुका जिंकण्यास मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला. सार्वजनिक प्रचार संपल्यानंतर केवळ मर्यादित वैयक्तिक संपर्कास परवानगी देण्याच्या आपल्या निर्णयाचा हवाला देत, राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना घरोघरी प्रचारादरम्यान लाऊडस्पीकर वापरण्यास आणि मोठ्या गटात फिरण्यास मनाई केली आहे. यावरती, पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राज्य निवडणूक आयोग नियम बदलत आहे. राज्य निवडणूक आयोग, सरकारने हरलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहे. निवडणुकांच्या अगदी आधीच ही नवीन परंपरा का सुरू करण्यात आली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये हा नियम का नव्हता? ही सवलत का देण्यात आली? नियम का बदलला? सरकारला जे हवे आहे ते करण्यासाठीच निवडणूक आयोग आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास आणि सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, कारण ते पैसे वाटू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट बसवण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ही यंत्रे वापरताना राजकीय पक्षांना माहितीही दिली जात नसल्याचा दावा त्यांनी केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणी सुलभ करण्यासाठी मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रथमच प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिटचा वापर केला जाईल. ते बॅकअप युनिट म्हणून काम करतील, असे बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले होते. इतर ईव्हीएम युनिट्सप्रमाणेच ही युनिट्सही निवडणूक अधिकाऱ्यांकडे राहतील आणि केवळ आपत्कालीन परिस्थितीतच वापरली जातील, असेही त्यांनी नमूद केले.