Narendra Modi : काँग्रेसने बेकायदेशीर स्थलांतरितांना आसामात वसवले आणि ते त्यांचे संरक्षण करत आहेत. म्हणूनच काँग्रेस पक्ष मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाला विरोध करत आहे. भाजपा मूळ मतदारांची ओळख आणि सन्मान जपण्यासाठी आसामसोबत पोलादी ढालप्रमाणे उभा राहील. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या आणि मतपेढीच्या राजकारणाच्या विषापासून आपण आसामला वाचवले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आपल्या दोन दिवसांच्या आसाम भेटीमध्ये नामपूर येथे विशाल जसनसभेला संबोधित करताना मोदी बोलत होते. तसेच मोदी यांनी दिब्रुगड जिल्ह्यात १०,६०१ कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या नवीन खत प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पाची क्षमता दरवर्षी अंदाजे १.२ दशलक्ष मेट्रिक टन खत उत्पादन करण्याची असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस अजूनही देशविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन देत आहे. हे लोक बांगलादेशी घुसखोरांना आसामच्या जंगलात आणि जमिनीत वसवू इच्छितात. त्यांना फक्त त्यांची मतपेढी मजबूत करायची आहे; त्यांना तुमची पर्वा नाही. काँग्रेसला तुमच्या ओळखीशी काहीही देणेघेणे नाही. आधुनिक खत प्रकल्पाच्या पूर्णतेबद्दल मोदी म्हणाले की, भाजपच्या डबल-इंजिन सरकारच्या अंतर्गत, उद्योग आणि कनेक्टिव्हिटी हातात हात घालून प्रगती करत आहेत, आसामच्या स्वप्नांना पंख देत आहेत आणि तरुणांमध्ये नवीन संधींची आशा निर्माण करत आहेत. विकसित भारताच्या उभारणीत शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावतात. या दृष्टिकोनातून, सरकार शेतकऱ्यांच्या हितांना प्राधान्य देण्यासाठी सतत काम करत आहे. पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसच्या काळात निर्माण झालेल्या या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे डबल इंजिन सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. गेल्या ११ वर्षांत बरेच काम झाले आहे, परंतु बरेच काही करायचे आहे.