मुंबई : नववर्षाच्या प्रारंभी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामान सतत बदलत होत आहे. आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढली असून पुढचे काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवू शकते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात हवामान मुख्यत: स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. या भागांत कमाल तापमान ३० ते ३२ अंशांच्या दरम्यान, तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी हलके धुके पडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम दृश्यमानतेवर होऊ शकतो. समुद्रकिनारी थंड वारे वाहतील मात्र तीव्र थंडी जाणवणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात दिवस आणि रात्रीच्या तापमानात फरक कायम राहणार आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा परिसरात किमान तापमान ८ ते १२ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळच्या वेळेत तीव्र गारठा जाणवू शकतो, ज्याचा थेट परिणाम हा आरोग्य व वाहतुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.