मुंबई – राजकीय रणधुमाळीचे अनोखे चित्र मंगळवारी समोर आले. एकीकडे महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या. तर, दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे राज्याच्या शहरी भागांत उडालेला प्रचाराचा धुरळा आता ग्रामीण भागांत पोहचेल. त्यातून ऐन थंडीत वाढलेला राजकीय तापमानाचा पारा जैसे थे स्थितीत राहील. महापालिका निवडणुकांतील प्रचारात शहरी मुद्दे महत्वाचे ठरले. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारात ग्रामीण गुद्दे अनुभवयास मिळतील. ग्रामीण भागांतील निवडणुकांमुळे राजकीय पक्षांची पुन्हा युती-आघाडी करण्यासाठी अन् उमेदवार निवडीसाठी धांदल उडणार आहे. त्याआधी सर्व राजकीय फोकस असेल तो महापालिका निवडणुकांसाठी येत्या गुरूवारी होणाऱ्या मतदानावर. त्यापाठोपाठ शुक्रवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.