panchayat samiti election | Zilla parishad election : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. ‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक : दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी मतदारांना दोनदा मतदान करावे लागणार असून, यासाठी 1 जुलै 2025 ची यादी वापरली जाणार असून, नॉमिनेशन ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे. 3 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्हा परिषद : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. एकीकडे राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महानगरांमध्ये निवडणुका संपताच, ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.