मुंबई : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने राज्यात मोठे यश मिळवले आहे. मागील वेळी 27 पैकी 17 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र यंदा 29 पैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळाले आहे. मुंबईत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासह शरद पवार गटालाही पराभवाची धूळ चारली आहे. अद्याप काही ठिकाणचे निकाल येणे बाकी असले, तरी राज्यातील पहिल्या महापालिकेचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून जालना महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. जालन्यात पहिल्यांदाच महापालिका; भाजपची एकहाती सत्ता जालना ही राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या दोन महापालिकांपैकी एक असून येथे पहिल्यांदाच महापालिका निवडणूक पार पडली. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. जालन्यात भाजपसमोर शिवसेना (शिंदे गट) कडून तगडे आव्हान होते. मात्र भाजपने या निवडणुकीत निर्णायक विजय मिळवत शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे. या पराभवामुळे शिवसेना (शिंदे गट) चे नेते अर्जुन खोतकर यांनाही मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 65 पैकी 41 जागांवर भाजपचा विजय जालना महानगरपालिकेतील एकूण 65 जागांपैकी भाजपने स्वबळावर तब्बल 41 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) ला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, भाजपने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली असून जनतेने भाजपला भरभरून कौल दिल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. जालना महानगरपालिकेत भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार, असा विश्वासही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात भाजपची लाट जालना पुरतेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची जोरदार लाट पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सांगली यांसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक ठळक होत असल्याचे चित्र आहे.