कोल्हापूर : पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची तारीख पुढे ढकलल्यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रुमबाहेर स्वतःच्या खर्चाने खासगी जागेत CCTV कॅमेरे बसवले होते. मात्र, नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी हे सर्व कॅमेरे काढून टाकल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन मराठा समाज हॉलमध्ये बंदिस्त करण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुमच्या आत नगरपरिषदेने स्वतःचे 8 CCTV लावले असून त्यांची लाईव्ह स्क्रीन बाहेर ठेवल्याचा दावा प्रशासन करतंय. मात्र बाहेरच्या बाजूला कोणतीही नजर नसल्याने यादव आघाडी व जनसुराज्य-ताराराणी आघाडीतील कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्याकडे तोंड असलेल्या खासगी जागेत स्वखर्चाने अतिरिक्त कॅमेरे लावले होते. “काहींनी तक्रार केली” असे सांगत प्रशासनाने हे कॅमेरे काढण्याची कारवाई केली. मात्र तक्रार कुणी केली, ती लेखी आहे का, याबाबत स्पष्ट उत्तर देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप उमेदवार करत आहेत. नगरपरिषद मुख्याधिकारी सुमीत जाधव यांनी म्हटले, “निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उमेदवारांना स्वतः CCTV लावण्याची परवानगी नाही. आम्ही पुरेसे कॅमेरे लावले आहेत, पत्रही दिले आहे. खासगी जागेतील कॅमेरे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप ठरतात, म्हणून काढले.” दुसरीकडे उमेदवार संदीप पाटील यांनी सांगितले, “आतले कॅमेरे फक्त प्रशासनाकडे आहेत, बाहेर काही दिसत नाही. शंका दूर करण्यासाठी आम्ही खासगी जागेत कॅमेरे लावले. ते काढून टाकल्याने शंका वाढली आहे. आता तरी बाहेर मोठी स्क्रीन लावून लाईव्ह फुटेज सर्वांना दाखवावे, ही आमची मागणी आहे.” दरम्यान, सध्या स्ट्राँग रुमसमोर कार्यकर्ते जागता पहारा देत असून तणावाचे वातावरण आहे. EVM स्ट्राँग रुमबाहेर खासगी सुरक्षा शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमबाहेर स्वतःचे खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. एकीकडे भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदाराला प्रशासन आणि पोलिसांवर भरोसा नसल्याचे चित्र आहे.