Sanjay Raut : राज्यात चर्चेत असलेले पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले असून, नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणावर अत्यंत महत्वपूर्ण टिप्पणी केली होती. एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव का नाही? असा थेट सवाल न्यायालयाने केला होता. त्यामुळे पोलीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संरक्षण देत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून तिची कसून चौकशी केली जात आहे. अशातच या प्रकरणावर अजित पवार यांनी एक मोठं विधान करत जमीन प्रकरणाचे खापर अधिकाऱ्यांवर फोडल्याचे दिसून आले. यावर आता ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विधानावर सणसणीत टोला लगावला आहे. अजित पवार काय म्हणाले होते? या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता, असे मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेत केले आहे. संजय राऊत काय म्हणाले? “पार्थ पवारांच्या पिताश्रींचे सरकारवर एवढं वजन आहे कोणाची हिंमत आहे सांगण्याची. जय शाहाला मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? जय शाह सांगेल तेच खरं तसंच पार्थ पवार सांगतील तेच खरं, अजित पवार यांनी आता फार रंगसंगती करू नये,” असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अजित पवार यांच्या पुत्राने गुन्हा केलेला आहे आणि हे हायकोर्टाने सांगितले आहे यांना का दूर ठेवले आहे, असेही राऊत बोलताना म्हणाले. हेही वाचा : गुडन्यूज! SBIचा ग्राहकांना मोठा दिलासा; स्वस्त केले कर्जाचे व्याजदर, ‘या’ तारखेपासून होणार लागू