जम्मू – सुरक्षा दलांनी रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला. त्यावेळी एक रायफल आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला. डोडा जिल्ह्यातील जंगलाच्या घनदाट भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या स्पेशल ग्रुपने (एसओजी) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) मदतीने संयुक्त मोहीम हाती घेतली. संबंधित मोहिमेवेळी दहशतवाद्यांच्या दडण्याचा अड्डा आढळला. सुरक्षा जवान पोहचले त्यावेळी कुठलाही दहशतवादी आढळला नाही. जवान दाखल होण्याआधीच दहशतवाद्यांनी अड्ड्यावरून धूम ठोकल्याचा अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत भयंकर हल्ला घडवला. त्यानंतर सुरक्षा दलांकडून त्या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांविरोधात धडक मोहिमा हाती घेतल्या जात आहेत.