Temba Bavuma Rection on Jasprit Bumrah Bauna remark : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नुकतीच झालेली मालिका केवळ मैदानातील चुरशीसाठीच नाही, तर मैदानाबाहेर घडलेल्या वादविवादांमुळेही चर्चेत राहिली. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळवला, तर वन-डे आणि टी-२० मालिकेत भारताने बाजी मारली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमावर केलेली एक टिप्पणी जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. आता या प्रकरणावर खुद्द टेम्बा बावुमाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं प्रकरण काय होतं? कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एका एलबीडब्ल्यू (LBW) अपीलदरम्यान बुमराहने बावुमाचा उल्लेख ‘बौना’ (बुटका) असा केला होता. ही टिप्पणी स्टंप माईकमध्ये स्पष्टपणे रेकॉर्ड झाली आणि सोशल मीडियावर त्यावर मोठी टीका झाली. त्यावेळी बावुमाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता दौरा संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. टेम्बा बावुमाने काय म्हटले? ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’साठी लिहिलेल्या आपल्या स्तंभात बावुमाने या घटनेचा खुलासा केला आहे. त्याने लिहिले की, “त्या दिवशी नक्की काय घडले हे मला माहित आहे. बुमराहने त्याच्या भाषेत माझ्याबद्दल काही शब्द वापरले होते. मात्र, दिवसाचा खेळ संपल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी माफी मागितली.” हेही वाचा – Vijay Hazare Trophy : ३२ चेंडूत शतक! सकीबुल गनीने मोडले सर्व विक्रम; इशान-वैभवलाही टाकले मागे बावुमा पुढे म्हणाला की, “जेव्हा त्यांनी माफी मागितली, तेव्हा मला त्या घटनेची कल्पनाही नव्हती. नंतर मीडिया मॅनेजरशी बोलल्यावर मला गांभीर्य समजले. मला वाटते, मैदानावर जे घडते ते तिथेच सोडले पाहिजे. तरीही, तुमच्याबद्दल जे बोलले जाते ते तुम्ही विसरू शकत नाही. मी अशा गोष्टींचा वापर स्वतःसाठी एक प्रेरणा म्हणून करतो.” प्रशिक्षकांच्या विधानावरही नाराजी – केवळ भारतीय खेळाडूच नाही, तर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुकरी कॉनराड यांनीही भारतीय संघाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर बावुमा म्हणाला की, “जेव्हा मी प्रशिक्षकांचे विधान ऐकले, तेव्हा मलाही ते आवडले नाही. मात्र, त्यांनी वन-डे मालिकेदरम्यान यावर स्पष्टीकरण देऊन हा विषय संपवला आहे.” हेही वाचा – Virat Kohli Century : विराटचं शतकासह दमदार कमबॅक! १५ वर्षांनंतर पुनरागमन करताना सचिनचचा मोडला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ अशा प्रकारे, कटू आठवणी मागे सारून बावुमाने खिलाडूवृत्ती दाखवली असली, तरी भविष्यात अशा स्लेजिंगमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.